डॉ. जगन्नाथ वाणी यांनी 1997  साली पुणे येथे ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’ (सा) ची स्थापना केली. अर्थातच कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात ‘फ्रेंडस ऑफ स्किझोफे्रनिया’ नावाची  संस्था स्थापन करण्यासाठी डॉ. वाणी यांनी पुढाकार घेतला होता. भारतातही आपल्या महाराष्ट्र राज्यात अशीच संस्था सुरू करावी हा त्यांचा मानस होता. सुरुवातीला मनुष्यबळ व निधी अभावी संस्था बाळसं धरू शकली नाही.  परंतू सन 2000 मध्ये त्यांचे दोन मित्र हरिभाऊ आठवले आणि यशवंत ओक या प्रशासकीय अनुभवी व्यक्तींना कार्यकारिणीत समाविष्ट करून घेतले. डॉ. वाणी यांनी ‘सा’ चे पहिले अध्यक्ष म्हणून यशवंत ओक यांचेकडे पदभार सोपविला. सुयोग्य व्यवस्थापनेसाठी ‘सा’ ला योग्य व्यक्ती लाभली होती.
वर्ष 2003 पर्यंत ‘सा’च्या कार्यरत असलेल्या सहकारी वर्गाने वेगळीच झेप घेतली. यावेळी डॉ. वाणी यांना कॅनेडियन सरकारकडून मोठे आर्थिक साहाय्य (अनुदान) प्राप्त झाले. महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशन (MSSO) आणि का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठानमार्फत ‘सा’ साठी इमारत बांधणे, जनजागृती संबंधित पुस्तकाचे प्रकाशन करणे, मानसिक आजाराबद्दल जागरूकता व्हावी यासाठी चित्रपट निर्माण करणे अशा विधायक कार्याला गती मिळाली. येथून ‘सा’ ने मागे वळून पाहिलेच नाही. 2010 साली डॉ. वाणी यांनी शुभंकर मुलींचे काळजीवाहक  श्री. अमृत बक्षी यांची ‘सा’ चे तिसरे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. बघता बघता ‘सा’च्या कार्याचा विस्तार वाढला. जनजागृती, पुनर्वसनाच्या कामास प्रशंसनीय गती प्राप्त झाली.
‘सा’ चे दैनंदिन व्यवहार शुभंकर, काळजीवाहक आणि स्वयंसेवक यांच्या व्यवस्थापकीय भूमिकेतून केले जातात.  ‘सा’ ही संस्था शुभंकर आणि कौटुंबिक काळज़ीवाहूंसाठी काम करणारी आहे. ‘सा’ चे कार्य मुख्यत्वे जागरूकता निर्माण करणे, समाजातील स्किझोफे्रनिया आणि इतर मानसिक विकारांबद्दलचे कलंक दूर करणे, मानसिक विकार असलेल्या व्यक्ती बचत गटांच्या कार्यात सक्रिय असणार्‍यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांची कौटुंबिक काळजी वाहणे यातून त्यांचे पुनर्वसन करणे हे उद्दिष्ट असते.
‘सा’ -सार्वजनिक सभा आयोजित करणे, प्रदर्शन, पथनाट्य, चर्चासत्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, चित्रपट निर्मिती, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित करणे, वृत्तपत्रातून लेख प्रकाशित करून जनजागृती करते तसेच सोशियल मीडियाचा वापर केला जातो. ‘सा’ च्या www.schizophrenia.org.in या संंकेत स्थळाचा जनजागृतीसाठी उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे ‘सा’ चे  www.facebook.com/SAA. माहिती प्रसारासाठी सोशल मीडिया माध्यम उपलब्ध आहे. ‘सा’ चे जगभरातील सुमारे 2400 फॉलोअर्स असून त्यातील अनेक व्यावसायिक, शैक्षणिक मानसोपचारतज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रातील विद्यार्थ्यांनी लाईव्स दिल्या आहेत. ट्विटर हँडलवर अधिकाधिक ट्विट्स मिळत आहेत..
‘सा’ चे ‘डॉ. जगन्नाथ वाणी रिहॅबिलीटेशन सेंटर’ च्या माध्यमातून मानसिक विकार असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. ‘एक्सपे्रसिव थेरपी’ च्या माध्यमातून संगीत, चित्रकला, चिकणमातीचे काम, नृत्य, गाणे, नाटक याशिवाय योग, बागकाम, पाककला, भरतकाम, शिवणकाम, खेळ, एरोबिक्स या प्रक्रियेतून स्वावलंबनाचे शिक्षण दिले जाते.  संगीत रोग बरा करणारे व तणाव कमी करणारे माध्यम आहे. या आजाराच्या रूग्णांना संगीताच्या माध्यमातून नैराश्य घालविता येते. ‘सा’ केंद्राद्वारे नृत्य चळवळ, शारीरिक थेरपी, मानसिकदृष्ट्या उन्नत करण्याचा एक उत्तम मार्गच नाही तर भयग्रस्त भावनेचा निचरा होण्यासाठी सुलभ मार्ग आहे. या प्रयोगातून  मानसिक आजाराशी संबंधीत लक्षणांचा प्रभाव कमी होतो.
योग ही केंद्रातील एक दैनंदिन प्रक्रिया आहे. योगासनातून शुभंकरांना मन प्रसन्न चित्त ठेवणे तसेच  मैदानी खेळ आणि जॉगींग च्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या तदुंरुस्त ठेवले जाते. एवढेच नाही तर त्यांचे भावनिक संतुलनही राखण्यास मदत होते.
पुणे शहरातल्या केंद्रातील पायाभूत सुविधा आणि केंद्रात राबविले जाणारे उपक्रम सर्वोत्कृष्ट आहेत. विविध उपक्रम राबविण्यात सल्लागार स्वत: स्वयंसेवकांसोबत काम करतात. आजारात उद्भवणार्‍या परिस्थितीला सामोरे जातात. शुभंकरांनी कार्यशाळेत तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून प्रोत्साहन म्हणून केलेल्या कामाचा   मासिक मोबदला दिला जातो.
केंद्रातर्फे रूग्णांना आणि तणावग्रस्त कुटुंबातील सदस्यांना दिलासा देण्यात येतो. रूग्ण एकमेकांशी संवाद साधतात. आजारात त्यांना एकटेपणा वाटत नाही. तसेच त्यांना आनंद मिळणार्‍या कृतीत त्यांना व्यस्त ठेवले जाते. प्रत्येक रुग्णाच्या प्रगतीचा आलेखची नोंद ठेवण्याची केंद्राकडे  एक योग्य पद्धत आहे. केंद्र रुग्णाच्या आरोग्याची  नियमित तपासणी व्यवस्था करते.
जे नियमित हजेरी लावतात त्यांच्यात लक्षणीय सुधारणा दिसून येते. केंद्रामधील सहकारी वर्ग, स्वयंसेवक आत्मविश्वासाची पातळी पुनर्संचयीत करण्यास मदत करतात. साहित्याच्या विक्रीतून मिळवलेले पैसे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भावना व्यक्त करतात. काही रोजगार व स्वयंरोजगारासाठी सुसज्ज देखील असतात. ‘सा’च्या माध्यमातून गरजुंना रोजगार मिळाला आहे. काहींनी स्वत:चे उद्योगदेखील सुरू केले आहेत.
कमलिनी कृतीभवनाचे दोन अतिरिक्त मजल्यांचे देखणे बांधकाम व भव्य रेऊ सभागृह ही ‘सा’ ला डॉ. वाणी यांनी दिलेली अनोखी भेट आहे. डॉ. वाणी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस ‘केअरगव्हर्स’ डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 2018 मध्ये समाजातील उपेक्षित विभागातील दोन महिला काळजीवाहूंचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना आर्थिक पाठबळ दिले गेले. ‘सा’ ला मिळालेल्या आर्थिक मदतीनुसार ‘सा’ ही संस्था देशाच्या काळजीवाहूंसाठी एक अखिल भारतीय कार्यक्रम बनवू इच्छित आहे. यासाठी कार्यशाळा व सेमिनार आयोजित करणे महत्त्वाचे ठरते.
‘मानसिक आजार आणि त्यांचे कुटुंब’ यासाठी ‘सा’ ने समर्पणातून संस्था पातळीवर एक वेगळेच स्थान   निर्माण केले आहे. ‘सा’ आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पुढे येत असते.  मानसिक आरोग्यक्षेत्रातील उत्प्रेरक म्हणून ‘सा’ ने मिळवलेले यश  संस्थापक स्व. डॉ. जगन्नाथ वाणी यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. ‘सा’ ही एक गतिशील आणि प्रगतीशील संस्था आहे आणि ती आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निश्चितच कटीबद्ध राहील याची खात्री आहे.