बरीच मंडळी आपली ऐहिक मालमत्ता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घट्ट पकडून ठेवतात. शेवटच्या क्षणी मृत्यू हे सर्व त्यांच्यापासून हिरावून नेतो. काही मंडळी मृत्युपत्राद्वारे या मालमत्तेला चिकटून राहायचा प्रयत्न करतात आणि काहींना तेही करता आलेले नसते. काहीही केले तरी यातून बर्‍याच वेळा वारसांमध्ये भांडणे आणि मारामार्‍या उद्भवतात. सुदैवाने माझ्या वडिलांना अशा प्रकारचा लोभ नव्हता. मरणापूर्वी खूप वर्षे आधी, 1974 साली, त्यांनी आपल्या सर्व मुलांची बैठक बोलावली आणि सर्वानुमते मालमत्तेची विभागणी केली. “येताना काही आणले नव्हते आणि जातानाही काही बरोबर येणार नाही” असा नुसता शाब्दिक घोष न करता त्यांनी तो मंत्र मला कृतीने शिकवला.

वडिलांच्याच शिकवणीनुसार मलाही त्यांच्या मालमत्तेत कुठल्याही प्रकारे रस नव्हता. कॅनडामध्ये मी सुखसमाधानाने राहात होतो. साहजिकच मी इस्टेटीचा वाटा घ्यायला नकार दिला. मी माझा वाटा घेऊन नंतर त्याची मला पाहिजे त्याप्रमाणे विल्हेवाट लावावी असा माझ्या धाकट्या बंधुने, रघुनाथ (आप्पा) याने, आग्रह धरला आणि मी नाइलाजाने त्याच्या आग्रहाचा स्वीकार केला. वडिलांनी दिलेला वाटा कुठल्याना कुठल्या स्वरूपात परत करायचा हे सदैव माझ्या मनात होते. त्यासाठी त्यांचे कायमस्वरूपी स्मारक करावे हा विचार सतत मनात घर करून होता.

 1981 साली वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या स्मारकाच्या कल्पनेने पुन्हा मला पछाडायला सुरुवात केली. खूप जणांनी खूप योजना पुढे केल्या. त्यात नावीन्यपूर्ण काही वाटले नाही. सभागृह, मंगल कार्यालय, कॉलेज, शाळा, इत्यादी. खाजगी इंजिनिअरींग कॉलेजची फायदेशीर कल्पनाही पुढे आली. परंतु फायदा हा हेतू कधीच डोळ्यापुढे नव्हता. याच काळात ‘अनुष्टुभ्’ परिवाराशी परिचय वाढत गेला, त्यांच्याबरोबर अनेक बैठकाही झाल्या. मराठीच्या प्रगत अध्ययन केंद्राची कल्पना त्या सर्वांच्या मनात घोळत होती. वडिलांच्या स्मारकासाठी ही कल्पना मला चांगली वाटली. परंतु अजूनही निर्णय पक्का होत नव्हता.

या कालावधीत खूप जणांच्या भेटीगाठी झाल्या. त्यात म. सु. पाटील, गंगाधर पाटील, अशोक केळकर, रा. भा. पाटणकर, मे. पुं. रेगे, रमेश वरखेडे, आणि इतर मंडळी भेटली. मराठीच्या प्रगत अध्ययन केंद्राची कल्पना पुन:पुन्हा पुढे आली. 1987 साली ‘अनुष्टुभ’ ला 10 वर्षे पूर्ण झाली आणि ‘अनुष्टुभ’ परिवाराने दशकपूर्तीचा मोठा सोहळा नाशकात साजरा केला. कवी कुसुमाग्रज मुख्य पाहुणे होते. त्यांच्या उपस्थितीत, वडिलांनी दिलेल्या वाटणीतून उपलब्ध होऊ शकणार्‍या 25 लक्ष रुपयांच्या निधीतून का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान निर्मितीचा मनोदय मी जाहीर करून टाकला आणि प्रतिष्ठानचा पहिला प्रकल्प का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था राहील असेही सांगून टाकले.

– मा. डॉ. जगन्नाथ वाणी