मराठीच्या प्राध्यापकांसाठी एक वैचारिक व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने संस्थांतर्गत भारतीय मराठी अभ्यास परिषदेचा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला. दि.8 जून 1990 रोजी कविवर्य कै. कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर यांच्या उपस्थितीत पहिले अधिवेशन संपन्न झाले. मराठी साहित्यात नवनव्या साहित्य प्रवाहानुसार, चळवळीनुसार चर्चा घडवून आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिषदेसाठी निवडलेल्या विषयावर सखोल चर्चा करण्यात येते.
दरवर्षी भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे आयोजन केले जाते. विषय निश्चित करून संबंधित विषयावर तज्ज्ञ अभ्यासकांकडून शोधनिबंध मागवले जातात. दोन दिवसांच्या पाच सत्रांमध्ये शोधनिबंधाचे वाचन होते. परिषदेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील मराठी विषयाचे प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थी सहभागी होतात. वाचलेल्या शोधनिबंधाचा समावेश संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘आमची श्रीवाणी’ अंकात विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला जातो. सदर परिषदेला उपस्थित राहाणार्‍या प्रतिनिधींचा खर्च विद्यापीठाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुदानास पात्र असतो.


प्रारंभापासून डॉ. यु. म. पठाण, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई, डॉ. गो. मा. पवार, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कविवर्य ना. धों. महानोर, डॉ. प्रभाकर मांडे इ. मान्यवरांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या डॉ. यशवंत मनोहर हे परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आजमितीस परिषदेला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत.